Saturday, January 13, 2018

‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा

‘लाल परी’ व्हाया खुताडपाडा





ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी....



ऐन दिवाळीत एसटी कर्मचा-यांनी संप केला आणि सारेच त्यांच्यावर उखडले. कोर्टाच्या आदेशानुसार ‘नाइलाजाने’ त्यांना तो मागेही घ्यावा लागला. पण काय आहेत त्यांच्या समस्या? संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? नक्की प्रकार आहे तरी काय? हे कर्मचारी कशा पद्धतीनं जगतात?.. हे समजून घेण्यासाठी आदिवासी पाड्यावर जाणारी मुक्कामी बस पकडली आणि गेलो त्यांच्याबरोबर रात्रीवस्तीला. त्यानिमित्त एसटी आतून आणि बाहेरूनही अनुभवता, समजून घेता आली. एसटी कर्मचा-यांच्या आणि ‘लाल परी’च्या प्रवासाचा हा ‘थक्क’ करणारा अनुभव..
मिठाच्या पाण्यात बुडवलेले आवळे, चिंचा, करवंद, जांभळं, कैºया आणि उसाचा रस हा संच एसटीच्या लाल गाडीबरोबर आलाच पाहिजे, अशी लहानपणी ठाम समजूत होती. मे महिन्यामध्ये रत्नागिरीला जायचं किंवा कोल्हापुरात परतायचं म्हटलं की या गोष्टी पाहिजेतच, त्याशिवाय प्रवास अशक्य असं मतच होतं. एसटीच्या बसशिवाय दुसरे पर्याय नसल्यामुळे तिचा भरपूर वापर व्हायचा; पण नंतर पर्याय आल्यावर एसटीचा प्रवास हळूहळू कमी झाला. यावर्षी नेमक्या दिवाळीच्या दिवसांमध्येच एसटीच्या कर्मचाºयांनी अभूतपूर्व संप केला आणि नंतर चार दिवसांनी त्यांना तो मागेही घ्यावा लागला. संपाच्या काळातल्या बातम्यांमुळे ‘लाल परी’ वगैरे म्हणवल्या जाणाºया एसटीची स्थिती आणि त्याहून तिच्या कर्मचाºयांच्या समस्या गंभीर असल्याचं लक्षात येत होतं. ‘वाट पाहिन; पण एसटीनेच जाईन’... प्रवाशांच्या सोयीसाठी या घोषणा, ब्रीदवाक्यं नक्की लोकांसाठी आहेत की नाहीत तेच समजत नव्हतं. संप बेकायदेशीर जाहीर झाला असला तरी त्यांचे प्रश्न सुटलेच नव्हते त्यामुळे स्वत: जाऊनच नक्की काय चाललंय, हे पाहुया असं ठरवलं...

संपाच्या काळात बातम्यांमध्ये ‘घाई’ला आलेल्या गाड्या पाहून एसटीच्या स्थितीचा अंदाज येत होताच; पण शहरी भागात असं आहे तर बाकी भागात काय स्थिती असेल?.. म्हणून शहरी नाही, ग्रामीण नाही सरळ आदिवासी भागातच जाऊ असा विचार करून दुपारी पालघरवरून खुताडपाडा नावाच्या पाड्यावर जाणाºया एसटीत बसलो. आता जिल्हा झाला असला तरी पालघर गावाने तालुक्याची कळा सोडलेली नाही. पालघर सोडल्या सोडल्या काहीवेळात खड्ड्यांनी हजेरी लावली. मुख्य रस्ता सोडल्यावर लहान लहान पाड्यांवरून एसटी जाऊ लागली. एकच चिंचोळा खडकाळ रस्ता, त्यातून उडणारी लालसर धूळ आणि समोरून एखादी जरी गाडी आली तरी केवळ दोन गाड्यांनीच होणारा ट्रॅफिक जाम!.. असं करत पाऊण तासात त्या पाड्यावर पोहोचलो. थोडी गर्दी कमी झाल्यावर बसमध्येच कंडक्टर सचिन बोरसे आणि ड्रायव्हर मेरे या दोघांशी ओळख करून घेतली. पालघरला परतल्यावर त्या दोघांना सातपाटी वगैरे आणखी दोन खेपा करायच्या होत्या. रात्री पुन्हा ते खुताडपाड्यालाच वस्तीच्या बसने येणार होते. आता ओळख झालीच आहे म्हणून त्यांना म्हटलं मग मी रात्री तुमच्याबरोबर पुन्हा येऊ का? मी इथेच राहीन रात्री. त्यावर ते दोघं चमकले.
‘हो, पण मच्छरदाणी लागेल तुम्हाला.’
म्हटलं, मच्छरदाणी तर नाही; पण ओडोमॉस आणेन पालघरातून. ते दोघेही म्हणाले, पण बघा कसं होतंय ते. त्यांच्याशी बोलत असतानाच पालघरला एसटी परतली आणि मी डेपोत उतरलो. पालघरच्या मुख्य केंद्रीय कार्यालयातील सात डेपोंपैकी हा मोठा आणि महत्त्वाचा डेपो समजला जातो. बोरसे-मेरे जोडी आता साडेसातनंतर परतणार होती आणि सव्वाआठच्या गाडीने आम्ही खुतडपाड्यावर जाणार होतो. ड्रायव्हर, कंडक्टर विश्रांती घेतात त्या जागी थोडावेळ जाऊ म्हणून एका पत्र्याच्या शेडसारख्या लांबलचक खोलीत गेलो. लांबलांबून आलेले खाकी पँटीतले, बनियन घातलेले ड्रायव्हर, कंडक्टर तेथे आराम करत होते. बहुतेकांच्या मोठमोठ्या ट्रंका होत्या. ट्रंकांच्या रांगा लावून प्रत्येकाने आपापली जागा निवडली होती, एकीकडे बाथरूम आणि शौचालय. संपासाठी भेटायला आलोय म्हटल्यावर सगळे एकदम चार्ज झाल्यासारखे झाले आणि घोळका करूनच बसले. सगळ्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं, कानात खुपसलेल्या वायर काढल्या आणि एकदम जोरात बोलू लागले. यांचे पगार फारच कमी असल्याचं संपाच्या काळात ऐकलेलं होतं म्हणून मुख्य प्रश्नावरच त्यांना आधी विचारलं. त्यावर सगळे तावातावाने बोलू लागले. सात-आठ हजारसुद्धा पगार हातात येत नाही आमच्या, मग आम्ही घरं कशी चालवायची तुम्हीच सांगा?..
बहुतेक लोक तिशी-चाळिशीचे होते. काही अगदीच नवीन, नोकरीला लागून तीन-चार वर्षेच झालेले कर्मचारी होते. त्यातला एक अगदीच तरुण होता. म्हणाला, ‘साहेब चार वर्षे झाली. दीडशे रुपये पगार वाढला फक्त!’
एका ड्रायव्हरने आपली पेमेंट स्लीप दाखवली. त्यानंतर सगळ्यांनीच पाकिटांतून आपापली स्लीप काढली. एक २१ वर्षे नोकरी पूर्ण झालेले कंडक्टर स्लीप दाखवू लागले. त्यांचा बेसिक पगार होता ९६२१ त्यावर महागाई भत्ता १२,०२६, घरभत्ता ९६२, धुलाईभत्ता ५०, मेडिकल ५३ आणि रात्रवस्तीचे व इतर भत्ते मिळून १२६५ रुपये मिळून त्यांचा पगार २३,९७७ होता. पण सोसायटीचे कर्ज व इतर कर जाऊन त्यांच्या हातात केवळ १५,४०६ रुपयेच पडत होते. ते म्हणाले २१ वर्षे नोकरी करून ही स्थिती आहे. ही असली पगारवाढ पाहून मी एकाच मुलीवर थांबण्याचा निर्णय घेतला. आपल्याबरोबर पोरांचे हाल नकोत.
त्यांचं बोलणं झाल्यावर म्हटलं, ‘तुम्ही सगळ्यांनी एसटीच्या बँकेचंच कर्ज का घेतलं?’, तर एक वाहक (हे कर्मचारी खास सरकारी मराठीत बोलत होते, मी ड्रायव्हर- कंडक्टर- डेपो म्हटलं तरी ते चालक-वाहक-आगार असंच बोलायचे. किंवा माझं बेसिक चार हजार पाचशे आहे म्हणण्याऐवजी ‘चारपाचशे’ बेसिक असंच सांगत होते.) म्हणाले, ही स्लीप बघून आम्हाला बँका उभंसुद्धा करून घेत नाहीत. मग एसटीच्या बँकेशिवाय पर्याय नाही. शिवाय पगारात भागत नाही म्हणून तिथं जावंच लागतं. ही बँक सव्वाबारा टक्क्याने कर्ज देते. आराम करायचं हे ठिकाण थोडं स्वच्छ दिसत होतं, त्याबद्दल विचारणार त्याआधीच एकानी निळ्या कपड्यातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसलेल्या पोरांच्या घोळक्याकडे बोट दाखवलं. हे जिल्ह्याचं ठिकाण म्हणून सफाईसाठी यांच्या कंपनीला काम आउटसोर्स केलंय. त्यांना पगार विचारा असं म्हणत त्यांनीच त्यांना पगार विचारला, त्यातल्या एका पोराने ‘साडेआठ’ असं उत्तर दिलं. ‘‘बघा! म्हणजे इथं यांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. नक्की कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा तेच कळत नाही. आता आपण ज्या खोलीत बसलोय त्यावर सिमेंटचे पत्रे असूनही त्यावर लोखंडी पत्रे घातलेत. मग हे असले भंपक बिनकामाचे खर्च करून काय मिळतं? त्यापेक्षा आमच्या सुविधांकडे लक्ष द्या ना, तो भिंतीवरचा फॅन बंद झालाय हे लक्षात आणून दिलं तरी दुरुस्त करत नाहीत; पण पत्र्यावर पत्रे घालायला पैसे आहेत त्यांच्याकडे.’’ आमची अशी चर्चा सुरू असताना बोरसे आणि मेरे बस घेऊन आले. रात्री साडेआठची गाडी घेऊन आम्ही आता परत खुताडपाड्याला जाऊ लागलो. 

शेवटची गाडी असल्यामुळे दुपारपेक्षा गाडी भरलेली दिसत होती.
पालघर सुटल्यावर गच्च काळोखातूनच बस जात होती. क्वचित वळणांवर सौरदिवे होते. दुपारच्या खुणा काहीच ओळखू येत नव्हत्या इतका काळोख झाला होता. पाड्यावर गेल्यावर ड्रायव्हरनी गाडी बाजूला लावली. गाडीच्या बरोबर वर एक बंद पडलेला सौरदिव्याचा खांब होता. बोरसे म्हणाले आम्हाला हा एकच आधार होता, तोपण बंद झालाय. तसे जवळच्या घरांमध्ये एकेक दिवे मिणमिणते दिसत होते; पण त्याचा यांना काहीच उपयोग नव्हता. एसटीच्या बसमधली एकच ट्यूबलाइट लावली आणि काही बसायच्या सीट्स दोन सिट्सच्या मध्ये पुलासारख्या टाकून त्याच्यावरच आम्ही डबे उघडले. जेवताना बोरसे म्हणाले, ‘सगळे दिवे लावले तर बॅटरी उतरेल आणि आपल्यालाच सकाळी गाडी ढकलायला लागेल’ म्हणून या एकाच ट्यूबमध्ये भागवायचं.
जवळपास पाण्याचीद्धा सोय दिसत नव्हती. ते दोघे मच्छरदाणी वगैरे लावून दोन सिटांच्यामधल्या जागेत झोपायच्या तयारीला लागले. त्यांना तुम्ही झोपा असं सांगून मी जवळच्याच आदिवासी घराच्या ओसरीवर जाऊन बसलो.
भात कापणीचे दिवस असल्यामुळे साडेनऊ-दहा वाजले तरी पाड्यावर थोडी जाग होती, नाहीतर हे पाडे अंधार पडल्यावर एकदम शांत होऊन जातात. खुताडपाड्यावर बहुतेक लोक ‘मल्हार कोळी’ (महादेव नव्हे) होते. शेजारच्या पाड्यांमध्ये वारली लोक राहातात. ओसरीवरच भाताच्या पेंड्या बांधायला लागणाºया दोºया वळायचं काम सुरू होतं. पेंड्या बांधणाºया नवरा-बायकोशी बोलू म्हणून एसटी संपाच्या काळात तुम्ही प्रवासाचं काय केलंत विचारल्यावर त्यांनी सांगितलं, ‘चार-दिवस पालघरला गेलोच नाही, मुलगी तिकडे नोकरी करते तिही नोकरीला जाऊ शकली नाही.’
पाड्यावर पाण्याची सोय फक्त एका विहिरीवर होती. बाकी कोठेच पाणी नव्हते. थोड्या अंतरावर नदी आहे; पण ते गावात आणायची कोणतीही सोय नव्हती. ते आदिवासी म्हणाले, ‘‘सूर्या नदीचं पाणी तिकडे शहरांना देतात; पण आमच्यासाठी काहीच सोय नाही.’’ ड्रायव्हर-कंडक्टरसाठी पाण्याची सोय नव्हतीच. त्यांनी पालघरमधून भरपूर बाटल्या भरून आणल्या होत्या, त्यावरच त्यांना जेवण करावं लागलं होतं. दुर्भिक्षामुळे सगळ्यांनाच पाणी जपून वापरायला लागत होतं.
एसटी हाच त्यांचा मुख्य आधार होता. इथून सगळ्या गाड्या पॅक होऊनच जातात असं बरंच काही ते बोलत बसले.

थोडावेळ बोलून एसटीत आलो तर हे दोघे झोपले होते. बसचा आणि तिच्या लोखंडाचा येणारा विशिष्ट वास कमी होण्यासाठी एक-दोन उदबत्त्या खिडक्यांमध्ये खोचून, उंदिर येऊ नयेत म्हणून त्यांनी खिडक्या बंद केल्या होत्या. बसच्या सीटवरच झोपायचा प्रयत्न केला; पण खुताडपाड्याचे डास आज पार्टीच्या मूड असावेत. माझ्या कानाशी, तोडांशी गाणी म्हणत डासांनी यथेच्छ जेवणं उरकली. नंतर ओडोमॉसच्या वज्रलेपानंतर थोडी झोप आली. मग आम्ही पहाटे पावणेपाचलाच सगळे उठलो. सकाळी सहाची बस असल्यामुळे लवकर आवरावं लागणार होतं. पहाटेच्या थंडीमुळे गाडी चांगलीच
गारेगार झाली होती. बसच्या बाहेर येतो तोच अंधारात पहिल्या बसने पालघरला जाणारे लोक बुट्टया, बादल्या, गाठोडी घेऊन बसले होते. पालघरमधून भरून आणलेल्या बाटल्यांच्या मदतीनेच आन्हिकं उरकली.
बोरसे म्हणाले, ''आता शाळेला सुटी आहे म्हणून गदी कमी आहे. नाहीतर बस भरुन जाते. शाळेला जाणारी मुलं आणि इतर लोकांमुळे इथूनच बºयाचशा लोकांना 'स्टँडिंग' जावं लागतं.'' आवरुन झाल्यावर बरोबर सहा वाजता त्या दोघांनी बस सोडली. पुन्हा थोडं बोलणं झालंच. बोरसे म्हणाले, ''सरकारने भरपूर प्रकारच्या सवलती लोकांना देऊन ठेवल्यात, ज्येष्ठ नागरिक, अपंग, आदिवासी पुरस्कार, खेलरत्न, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, विधानमंडळाच्या आजीमाजी सदस्यांना व त्यांच्याबरोबर एका व्यक्तीला मोफत प्रवास करता येतो. अशा सवलती सरकार स्वत: जाहीर करते पण त्यामुळे महामंडळाला येणारा खर्च मात्र देत नाही. ते पैसे मिळाले तरी एसटीचं मंडळ तोट्यातून थोडं बाहेर येईल. सवलती जाहीर केल्यावर नाव त्यांचं होतं पण खर्च आमचाच होतो. आम्ही किती कमी पगारात जगायचं अजून? आता हंगामात एसटीचं भाडं वाढतं पण ते कोणाला माहितीच नसतं. परवा हंगाम सुरु झाल्यावर शाळेच्या पोरांकडे नेहमीपेक्षा एक रुपयाही जास्त नव्हता. मी पहिल्याच दिवशी ३६ रुपये स्वत:च्या खिशातून घातले. असं कसं चालवणार आम्ही. साईडमिररला काही झालं तरी ड्रायव्हरच्या पगारातून त्याचा खर्च भरुन घेतात.''
काल दुपारी १ वाजता ही ड्रायव्हर-कंडक्टरची जोडी ड्युटीवर हजर झाली होती. जवळच्या गावांमध्ये दिवसभर फेºया मारुन ते रात्री पाड्यावर वस्तीच्या गाडीबरोबर राहिले होते. आता पालघरला पोहोचल्यावर त्यांना जव्हारला जावं लागण़ार होतं. मगच त्यांची ड्यूटी संपणार होती. कालपासून
'एसटी' आतूनबाहेरुन थोडी समजायला लागली होती. त्या आठवणीतल्या चिंचा-आवळ््यांविनाच तोंड आंबट झालं, नव्हे कडूच झालं. लाल परी वगैरे विशेषण नाही तर उपहास आहे असं खात्रीनं वाटायला लागलं.

सांगा, संसार कसा करायचा?
अचानक एका एसटी कर्मचा-यानं खिशातून काहीतरी लिहिलेली लांबलचक पट्टी काढली. त्यावर आडवे रकाने करून आकडे लिहिलेले. ही होती त्यांची पगाराची स्लीप. चार वर्षे नोकरी करणाºया त्या ड्रायव्हरचा बेसिक पगार होता ४,७०० रुपये, त्यावर ५८७५ महागाई भत्ता, ४७० रुपये घरभाड्याचे, ५० रुपये धुलाई भत्ता, रात्रीवस्ती केल्याबद्दल मिळणारा ६५१ रुपये भत्ता (हे अंतरानुसार बदलते) असा त्यांना साधारण साडेअकरा हजाराच्या आसपास पगार मिळत होता. नंतर १२६९ रुपये भविष्यनिर्वाह निधीपोटी कापले जातात, २०० रुपये व्यवसाय कर कापलेला दिसत होता. पगारात भागत नाही म्हणून त्या ड्रायव्हरने दिवाळी उचल घेतलेली होती. त्याचा हप्ता १००० आणि एसटीच्या बँकेच्या कर्जाचा हप्ता ९०० रुपये कापलेला होता. त्याच्या हातात कसेबसे ८३३१ रुपये आलेले होते. हे आकडे दाखवून तो म्हणाला, पालघरमध्ये खोली घ्यायची तर अडीच हजार लागतात, लाइटबिल वगैरे इतर खर्च करून आमच्या हातात काहीच पडत नाही, तुम्हीच सांगा या पगारात आम्ही संसार कसा करावा. त्यांचं बोलणं सुरू असताना मी मध्येच ‘सेव्हिंग’ शब्द उच्चारला. तर ते हसायलाच लागले. एक भोकं पडलेला बनियन घातलेले कंडक्टर मी आल्यापासून तावातावाने बोलत होते तेच म्हणाले, ‘‘अहो हा शब्द डेपोत उच्चारायचा नाही. एसटीत पाऊल टाकलं की सेव्हिंग विसरायचं!’’

जेवणासाठी ११ रुपये, कुटुंबासाठी मेडिकल भत्ता ५३ रुपये!
दुपारी खुताडपाड्याला जाताना रस्त्यात खड्डे चांगलेच जाणवत होते, असल्या रस्त्यामुळे पाठीचे आणि कंबरेचे त्रास कोणाला झाले का असं या एसटी कर्मचा-यांना विचारताच एक वाहक म्हणाले, ‘‘कोणाला हा त्रास नाही ते विचारा. सगळ्यांच्या पाठीत ‘गॅप’ आहे. संपूर्ण कुटुंबासाठी आम्हाला मंडळ ५३ रुपये मेडिकल भत्ता देतं, यापेक्षा दुसरी चेष्टा नसेल. काही औषधपाणी करून बिल दाखवलं तर ते आधी एसटीच्या डॉक्टरला दाखवावं लागतं मग मुख्यालयात त्यात शंभर शंका काढतात, ही ट्रीटमेंट चालणार नाही, हे नको, फक्त गोळ्याच चालतील.. असं करत कसंबसं निम्मं बिल मिळतं. ५३ रुपयांप्रमाणे दुसरी चेष्टा आहे ती रात्रवस्ती जेवणाची. रात्रवस्तीला जेवणापोटी आम्हाला ११ रुपये मिळतात. या ११ रुपयांमध्ये खेड्या-पाड्यांत चालक-वाहक ४० लाखाची गाडी घेऊन राहतात. कोणी दगड मारला, काच फुटली, आरसा गेला तर तुझं लक्ष कुठं होतं असं विचारून प्रसंगी आमच्या पगारातून पैसे कापून घेतात!’’

एका ग्रंथराजाची चारशे वर्षे

एका ग्रंथराजाची चारशे वर्षे 

ओंकार करंबेळकर 

सांस्कृतिकीकरणाचा जनक 
म्हणजे फादर थॉमस स्टीफन्स. 
आपल्या संपूर्ण हयातीत 
ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा त्यांनी केली. 
बायबल आणि ख्रिस्तजीवनाला 
त्यांनी मराठीत आणले.
कोकणीचे व्याकरण लिहून 
भारतीय भाषेतील व्याकरण 
प्रथम छापून आणण्याचा 
मानही त्यांच्याकडेच जातो.
त्यांनी लिहिलेल्या 
‘ख्रिस्तपुराण’ला यंदा नुकतीच 
चार शतके पूर्ण झाली आहेत.




२२ आॅक्टोबर १५७९ रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर लागलेल्या बोटीतून ती व्यक्ती उतरली. त्यानंतर गोवा हीच कर्मभूमी मानून मृत्यूपर्यंत तिने गोवा, ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा केली. बायबल आणि ख्रिस्तजीवनाला मराठीत आणले, कोकणीचे व्याकरण लिहून भारतीय भाषेतील व्याकरण प्रथम छापून आणण्याचा मान मिळवला आणि १६१९ साली चिरनिद्रेसाठी गोव्यातच देह ठेवला. भारतात पाऊल ठेवणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती असे समजली जाणारी आणि ख्रिस्तपुराण लिहिणारी ही व्यक्ती होती फादर थॉमस स्टीफन्स. माझ्या मराठीची बोलु कौतुके, परिं अमृतातेही पैजा जिंके या मराठीच्या ज्ञानेश्वरांनी केलेल्या अजरामर वर्णनाप्रमाणे, 
जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी, 
की परिमळांमाजी कस्तुरी, 
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया 
असे वर्णन फादर स्टीफन्सनी केले. मराठीचे त्यांनी केलेल्या या कौतुक आणि ख्रिस्तपुराणास यंदा चारशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
थॉमस स्टीफन्स यांचा जन्म १५४९ साली इंग्लंडमध्ये विल्टशायर परगण्यातील क्लिफ पिपर्ड येथील बुश्टेन येथे झाला. विन्चेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रोटेस्टंट चर्चच्या छळाला कंटाळून कॅथलिक लोकांना पळून जावे लागले. त्यामुळे शिक्षणानंतर स्टीफन्सही रोमला गेले. तेथे जेसुईट संघामध्ये प्रवेश झाल्यानंतर समुद्रमार्गे मोठा प्रवास करून ते भारतामध्ये आले. अनोळखी प्रदेशातून प्रवास करतानाही त्यांची चौकस आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते. गोव्यापर्यंतच्या प्रवासाचे साद्यंत वर्णन त्यांनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना केले आहे. वाटेत लागलेला प्रदेश, प्रवासात दिसलेले पक्षी, मासे, लोक यांचेही वर्णन त्यांनी या पत्रांमध्ये केले आहे. गोव्यामध्ये आल्यानंतर येथील मातीशी आणि भाषेच्या प्रेमातच ते पडले. त्यांना पोर्तुगीज, इंग्रजी या भाषा आधीच अवगत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी व कोकणी भाषा आत्मसात केल्या. लोकजीवनाचा अभ्यास करत स्टीफन्सनी भारतीय संस्कृतीचीही माहिती गोळा केली. याच काळामध्ये त्यांनी कोकणी भाषेचे व्याकरणही लिहिले. भारतामध्ये येताना किंवा भारतात आल्यावर त्यांच्यासाठी सर्वच अनोख्या गोष्टींच्या भेटी झाल्या. त्या काळात नव्याने धर्मांतर केलेल्या लोकांना देवाची स्तुती किंवा पुराणासारखी रचना वाचण्यासाठी हवी होती. ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत त्यांच्या भाषेत आपल्याला संवाद साधता आला पाहिजे हे जाणवल्यामुळेच त्यांनी कोकणी आणि मराठीचा अभ्यास सुरू केला. लोकांच्या या मागणीनुसार त्यांनी बायबल आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ११,००० ओव्यांचा ख्रिस्तपुराण हा ग्रंथच सिद्ध केला. स्टीफन्सनी महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायात प्रसिद्ध असणाऱ्या संतांच्या ग्रंथांप्रमाणेच ख्रिस्तपुराणाची रचना केली आहे. संत एकनाथांचे ते समकालीन होते, त्यांच्या पुस्तकातील शैलीही एकनाथकालीन भाषेच्या शैलीप्रमाणे आहे. ख्रिस्तपुराणाचे स्टीफन्सनी दोन भाग केले आहेत. त्यातील पहिला भाग पहिले पुराण (आदि पुराण) हे जुना करार किंवा ओल्ड टेस्टामेंटवर आधारित आहे, तर दुसरे पुराण (देव पुराण) हे नवा करार किंवा न्यू टेस्टामेंटवर आधारलेले आहे. पहिल्या पुराणात विश्वाची निर्मिती, अ‍ॅडम-इव्हची गोष्ट, तर दुसऱ्या पुराणात येशूच्या जीवनाची माहिती गोष्टीरूपाने दिली आहे.
ख्रिस्ताच्या जीवनाचे मराठीकरण करताना स्टीफन्सनी सगळा बाज अस्सल देशी आणि भारतीय संस्कृतीच्या आधाराचा वापरला आहे. 
शं. गो. तुळपुळे यांनी यासंदर्भात अत्यंत मार्मिक आणि चपखल वर्णन केले आहे. ते म्हणतात, स्टीफन्स यांनी भाषा, विचार, कल्पना आणि काव्यात्मक रचना मराठीच वापरल्या आहेत. बाहेरून एखाद्या हिंदू देवळाप्रमाणे तर आतमध्ये फक्त येशूची मूर्ती अशी या पुराणाची रचना केली आहे. तुळपुळे यांनी म्हटल्याप्रमाणे खरच स्टीफन्स यांनी उत्तमोत्तम शब्दांची रचना केली आहे. काही परदेशी संकल्पनांना नव्या संज्ञाही दिल्या आहेत, तर काही शब्द त्यांनी तयारही केले आहेत. बाप्तिस्माला त्यांनी ज्ञानस्नान हा सुंदर शब्द वापरला आहे. तसेच सॅक्रीफाईसला पूजा आणि क्रुसला सिळुवी (सुळी) असे शब्द वापरले आहेत. संपूर्ण पुराणामध्ये नैवेद्य, पुराण, ग्रंथ, वैकुंठ, ब्राह्मण, नमन, देवस्तुती, संतमहंतस्तुती, होम, अर्पण, समर्पण, शास्त्र, वचन असे अनेक शब्द वापरले आहेत. याबरोबरच दोन शब्द एकत्र करूनही काही नव्या संज्ञा त्यांनी तयार केल्या आहेत. देव-पूजा, भव-कर्म, पाप-कर्म, कर्म-तम, शास्त्र-पुराण, सत्त्व-कृपा, परम-शास्त्र, मोक्ष-माहेर, आनंद-स्थान 

असे शब्द एकत्र करून नव्या संज्ञा किंवा शब्दसमूहांची योजना त्यांनी केली आहे. तसेच वाचक किंवा या पुराणाचे श्रवण मराठी, कोकणी करणार आहेत याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला असावा असे वाटते. कोकणी माणसाला समजावे म्हणून मेंढपाळाऐवजी गोपाळ असा शब्द वापरण्यामागे तोच हेतू असावा. 
ख्रिस्तपुराण लिहून झाल्यावर तो छापण्यापर्यंतही स्टीफन्स यांना अनेक अडथळे आले असावेत. कारण ग्रंथाचे काम १६०८ सालीच पूर्ण झाले होते; पण तो छापायला आठ वर्षांचा काळ जाऊन १६१६ वर्ष उजाडावे लागले. १५५६ साली एक प्रिटिंग प्रेस इथिओपियामध्ये पाठविण्यात येणार होती. मात्र तेथील राजाचे कॅथलिक धर्माबाबतचे मत फारसे अनुकूल नव्हते त्यामुळे ती भारतात पाठविण्यात आली. गोव्याच्या गव्हर्नरनी ती गोव्यात असावी अशी इच्छा दर्शविली म्हणून ती गोव्यात आली. त्या प्रेसमध्ये १५५६ साली उङ्मल्लू’४२्रङ्मल्ली ढँ्र’ङ्म२ङ्मस्रँ्रीं२ आणि त्याच्या पुढच्या वर्षी सेंट झेवियर्सनी लिहिलेले उं३ीूँ्र२ेङ्म ऊङ्म४३१्रल्लं उँ१्र२३ं छापलं गेलं आणि त्यानंतर तिसरं पुस्तक औषधोपचारावर छापण्यात आलं. स्टीफन्सनी लिहिलेले ख्रिस्तपुराण १६१६ साली छापलं गेलं, ते याच प्रेसमध्ये छापलं गेलं असं मानण्यात येतं. 
कोकणी आणि मराठीतले शब्द छापणे त्याकाळात अवघड होते. १६०८ साली स्टीफन्स यांचे सर्व काम पूर्ण झाले होते. गोव्याच्या जेसुइट फादर प्रोव्हिन्शिएलला हे छपाईचे काम करण्यासाठी व शिफारस करण्यासाठी स्टीफन्सनी रोमचे जनरल वरिष्ठ फादर क्लौडियस आक्वाकिवा यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी इथल्या भाषेत आपल्या भाषेप्रमाणे सुटी अक्षरे नसल्यामुळे सहाशे साचे करावे लागतील असे लिहिले आहे. या सहाशे साच्यांचा खर्च मोठा असल्यामुळे दोनशे साचे कमी करून चारशे साच्यांमध्ये हे पुराण देवनागरीऐवजी रोमन लिपीत छापले गेले. १६११-१२ या कालावधीत स्टीफन्सची बदली वसईला भाषेचे शिक्षक म्हणून झाली होती. या वर्षभरामध्ये त्यांनी ख्रिस्तपुराणात दुरुस्ती आणि संपादन केले असावे. हे वर्ष त्यांनी वसईच्या किल्ल्यामध्ये जेसुइट हाऊसमध्येच काढले. ग्रंथ छापण्याचे कायदे त्याकाळी अत्यंत कडक होते. या ग्रंथाचा दृष्टिकोन मूळ पोर्तुगीज भाषेतील ग्रंथाच्या दृष्टिकोनाशी जुळतो की नाही हे पडताळण्यात आले. त्यानंतर पाऊलो मास्कारेनस, फ्रान्सिस्को बार्जेस देसुझा, जोआवो फर्नांडिस दे अल्मेडा, फादर ख्रिस्तोवांवो, आचर्बिशप प्रिमेट, फ्रान्सिस्को व्हिएरा यांनी दिलेल्या अभिप्रायानंतरच हा ग्रंथ छापण्यास सिद्ध झाला. 
फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराणाबरोबर आर्ते दि लिंगोआ कानरिम आणि दोत्रिना ख्रिस्तां एम लिंगोआ ब्रमाना-कनारिम ही पुस्तके लिहिली. मात्र ती त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली आहेत. ख्रिस्तपुराणाची रोमन लिपीतील पहिली प्रत १६१६ साली गोव्यात रायतूर येथे प्रसिद्ध करण्यात आली. दुसरी प्रत तेथेच १६४९ साली आणि १६५४ साली ओल्ड गोव्यामध्ये तिसरी प्रत प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९०७ साली मंगळुरूमध्ये जोसेफ एल. सलडान्हा यांनी प्रकाशित केली. या सर्व प्रती रोमन लिपीमध्ये होत्या. पाचवी आणि देवनागरीमधील पहिली प्रत पुण्यामध्ये १९५६ साली शांताराम बंडेलू यांनी प्रकाशित केली, तर देवनागरीतील दुसरी प्रत मुंबईमध्ये फादर कारिदाद द्रागो एस. जे. यांनी प्रसिद्ध केली. आजच्या देवनागरी ख्रिस्तपुराणाबाबतचा सर्वात महत्त्वाचा शोध लंडनमध्ये जस्टीन अ‍ॅबट यांनी लावला. 
अ‍ॅबट यांना ती प्रत तेथील द स्कूल आॅफ ओरिएंटल स्टडीज येथे मर्सडन कलेक्शनमध्ये मिळाली. त्यातील देवनागरी लिपी, मराठी व कोकणी भाषा पाहून अ‍ॅबट यांनी ती प्रत ख्रिस्तपुराणाची असल्याचे ओळखले. यानंतर सर्व प्रतींचा अभ्यास करून तसेच तौलनिक विचार करून वसईच्या फादर नेल्सन फलकाव यांनी ख्रिस्तपुराण मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या पीएच.डी.चा विषयच त्यावर आधारित होता. त्यांच्याआधी असे पहिले संशोधन सं. ग. मालशे आणि इटालियन भाषेत बेनेदत्ता क्वाद्रा यांनी केले आहे.
स्टीफन्सनी वापरलेले शब्द आणि ओवीबद्ध रचना रसाळ म्हणावी अशीच आहे. ग्रंथाच्या सुरुवातीस ते श्री सर्वेश्वर प्रसन्न, श्री देवमाता प्रसन्न, श्री गुरू प्रसन्न असे लिहून देवाला वंदना करतात. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस त्यांनी हे वंदन केले आहे. ओम नमोजी आद्याप्रमाणे त्यांनी 
ओम नमो वीस्वभरिता, 
देवबाप्पा सर्व समर्था 
परमेश्वरा सत्यवंता, 
स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा
अशा शब्दांमध्ये सुरुवात केली आहे, तर शेवटी न्यून ते माझेच्या धरतीवर 
या दोहि पुराणां भितरि, 
काहिं चुकि देखाल जरि
तरि क्षेमा करोन मांझेवरी, 
न किजे कोपु
अशी वाचकांची माफीही मागितली आहे. जर मी सांगितलेल्या पुराणांमध्ये काही चुका असतील तरी लोकहो तुम्ही रागावू नका, मला क्षमा करा, असे नम्रपणे स्टीफन्सनी लिहून ठेवले आहे. 
अ‍ॅडम इव्हची गोष्ट, डेव्हिड, जेकब यांच्यासारखी पात्रे त्याचप्रमाणे वैकुंठवर्णन वगैरे प्रसंग स्टीफन्सनी लिहिलेल्या पुराणात वाचल्याच पाहिजेत इतक्या सुंदर शब्दरचनेत त्यांनी मांडल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात,
राहेल मेघांचे वरुशण, 
निर्मळ जाहाले गगन
ते जें फांकले गगन, तारामंडळी
अंकुवारिचा प्रसुतकाळ, 
पाहावयालागी निर्मळ
चंद्र जाला उताविळ, तारांगणेसि
नक्षत्रे दुसरा प्रहरि, 
तापली होती पुडारि
ते नवल पाहावया आबंरि, 
स्छिराऊ पाहति 
..म्हणजे (ख्रिस्त जन्मावेळेस) ढगांनी पाऊस पाडायचे थांबवले, आकाश स्वच्छ झाले, आकाशात ताऱ्यांचे तेज पसरले. कुमारिकेचा निर्मळ प्रसूतीकाळ पाहण्यासाठी चंद्र तारांगणात उतावीळ झाला. दुसऱ्या प्रहरांमध्ये जी नक्षत्रे उगवली होती, ती ते पाहण्यासाठी थांबली होती अशा शब्दांमध्ये त्यांनी येशूजन्माचे वर्णन केले आहे. 
येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर पुन्हा सचेतन झाले त्याचे वर्णन भगवद्गीतेतील नैनं छिन्दंती शस्त्राणी प्रमाणे आहे. सचेतन झालेल्या शरीराबाबत येशू स्वत:च म्हणाला, 
ना आंग्नीचेन जाळिजे, 
ना उदकाचेन न भीजजे
ना वायूचेन शोखीजे, 
ऐसी कुडि उतमी
(गीतेतील वर्णन आणि यातील वर्णनात इतकाच फरक म्हणजे गीतेमध्ये आत्म्याचे वर्णन केले आहे आणि येथे शरीराचे वर्णन केले आहे.) 
अशाप्रकारे एकाहून एक सरस ओव्यांमध्ये येशूचे जीवन दुसऱ्या पुराणात स्टीफन्स यांनी बांधले आहे. 
नक्की कोणत्या कारणामुळे ते सांगता येणार नाही मात्र मराठी वाचक आजही पुष्पामाजी पुष्पा मोगरीच्या पलीकडे स्टीफन्सकडे गेलेले नाहीत. त्यामुळेच भाषेच्या, इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि वाचकांनी ख्रिस्तपुराण वाचणे आवश्यक वाटते.

देशीवादाचे आद्य प्रणेते
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील लोकांना धर्मग्रंथ समजावेत यासाठी त्यांच्याच भाषेत आणण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला. माझ्यामते आज ज्या देशीवादाचा उल्लेख केला जातो त्याचे आद्य प्रणेते स्टीफन्स आहेत. गोव्यातील भूमीची, लोकांची, संस्कृतीची ओळख त्यांनी करून आणि यातील प्रत्येक घटकाची सांगड ख्रिस्तपुराण लिहिताना त्यांनी घातली. त्यांनी धर्मग्रंथ आणि परंपरांचे सांस्कृतिकीकरण आणि भारतीयीकरण केले. ख्रिस्ताविषयी त्यांनी वापरलेली विशेषणे अभिनव, कल्पक (ओरिजिनल) अशी आहेत. ख्रिस्तपुराणाची काव्यरचना एकदम रसात्मक असून, शृंगार वगळता सर्व रस त्यामध्ये योजले आहेत. कॅथलिक चर्चच्या कडक नियमांचे प्रभाव असूनही स्टीफन्सनी भरपूर स्वातंत्र्य घेतले आहेत. नैवेद्यासारखे शब्द ख्रिस्ताच्या संदर्भात वापरणे त्यामुळेच धाडसाचे वाटते. आजचे संदर्भ वापरले तर स्टीफन्स यांनी वापरलेल्या नव्या शब्दांमुळे आणि त्यांनी सिद्ध केलेल्या या ग्रंथामुळे क्रांतिकारकच म्हटले पाहिजे. त्यांचा कोकणी व्याकरणाचा उत्तम अभ्यास होता, त्यांच्या शैलीची एकनाथांच्या शैलीशी तुलना केली जाते.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटो लेखक, वसई

सांस्कृतिकीकरणाचे जनक
फादर स्टीफन्स हे दोन धर्मांच्या गाठीभेटीचे साक्षीदार आहेत. धर्माच्या गाठीभेटी, संवाद होताना होणाऱ्या घडामोडींमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यापूर्वीच्या प्रसारकांनी आणि धर्मगुरूंनी प्रार्थनांचा अनुवाद करणे किंवा शिकवण देणे इथपर्यंतच प्रयत्न केले. पण स्टीफन्स त्या सर्वाच्या पलीकडे गेले. त्यांनी भाषांवर प्रभुत्व मिळवले. येथील भाषांच्या व्याकरणाचा अभ्यास केला. ख्रिस्तपुराण वाचले की त्यांची कल्पक दूरदृष्टी दिसून येते. स्थानिक लोकांसाठी त्यांनी सांस्कृतिकीकरणाचे जे प्रयत्न केले ते त्यांच्या आधी कोणीच केलेले नव्हते.
- फादर नेल्सन फलकाव, एस.डी.बी., वसई 
(फलकाव यांनी ख्रिस्तपुराण इंग्रजी व सध्याच्या मराठीत अनुवादित केले आहे. ते ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक असून, अध्यापनही करतात.)

भाषेचा अभ्यासक
चारशे वर्षांपूर्वी सर्व साहित्य भक्तिरसाच्या आधारावर निर्माण होत असे. या भक्तिरसामध्ये ओवीबद्ध रचना केल्याशिवाय ती मराठी माणसाला समजणार नाही हे फादर स्टीफन्सनी ओळखले आणि इथल्या भाषा शिकून घेतल्या. त्यांच्या लेखनाचा अभ्यास केला की त्यांनी संत वाङ्मय आणि वेदांचाही अभ्यास केला असावा हे जाणवते. 
- कृष्णाजी कुलकर्णी 
(निवृत्त प्राध्यापक) बोरी, गोवा