Tuesday, December 18, 2018

1857 च्या बंडाचा थरार अनुभवणाऱ्या लेखकाच्या घरी....


१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १६० वर्षे यंदा पुर्ण होत आहेत. या बंडाची सुरुवातीपासून हकीकत लिहिणारे विष्णूभट गोडसे यांनी केलेल्या प्रवासातील आठवणपर लेखनामुळे 'माझा प्रवास' हा एक महत्त्वाचा दस्तावेज मराठीत आणि पर्यायाने संपुर्ण भारतीयांना उपलब्ध झाला आहे. पेण जवळच्या एका लहानशा खेड्यातील हा तरुण भटजी काकांबरोबर कुटुंबावरील कर्ज फेडण्याच्या उद्देशाने उत्तरेत जातो काय, बंडाच्या धामधूमीत त्यांचं सापडणं, पेशवे, तात्या टोपे, झाशीच्या राणीच्या आठवणी, लढाया आणि झाशीतले वास्तव्य हे सगळं थक्क करायला लावतं. इतक्या संकटात सापडूनही जिवंत पुन्हा वरसईला येणं हेसुद्धा आश्चर्यच होतं. त्यांच्या पुस्तकात सुरुवातीला वरसई आणि परिसराचे थोडे वर्णन येतं आणि संकटकाळात सतत गावातील वैजनाथाचे स्मरण ते करताना माझा प्रवासमध्ये करताना दिसतात. त्यामुळे बंडाला १६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने तरी वरसईला जाऊ असा विचार करुन निघालो.

पेणनरुन खोपोली मार्गाने जायला लागलं की साधारण अकरा-बारा किलोमीटरवर वरसईचा फाटा लागतो. एका बाजूला वरसई तर दुसऱ्या बाजूला विनोबांचं गागोदे आहे. भर पावसातून त्या मोकळ्या रस्त्यावरुन आमची बस जाताना या सगळ्या परिसराने पाहिलेल्या इतिहासाचेच विचार डोक्यात येऊ लागले. गागोदे गाव विनोबा भाव्यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे, वयाची पहिली दहा वर्षे विनोबांनी इथेच काढली. आई-बाबा-आजोबांच्या शिकवणीतून ते इथेच घडले. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच गागोद्याच्या खिंडीमध्ये छ. शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना लूटला होता अशी आख्यायीका आहे. प्रबळगडाच्या प्रभावळीतले सांकशी आणि माणिकगड हे दोन्ही किल्ले वरसईच्या बाजूस आहेत, त्यातला माणिकगड पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना द्यावा लागला होता.  पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची मुंजही वरसईलाच झाली होती, त्यावेळेस त्यांनी चांदीच्या 21 दुर्वा गावातल्या वैद्यांच्या गणपतीला वाहिल्या असा उल्लेख गॅझेटमध्ये आहे.  त्यामुळे हा सगळा परिसरच गेली तीन-चारशे वर्षे इतिहासाचा साक्षीदार झाला असणार.

गागोद्याला मागे टाकून वरसई फाट्यामधून आत जायला लागलं की बाळगंगा नदी आपल्या सोबत समांतर वाहू लागते. एक अरुंद रस्ता आमच्या बसला वरसईला घेऊन गेला. विष्णूभट गोडसे, भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य आणि इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या जन्मगावात मी जाऊन पोहोचलो होतो. आजूबाजूच्या गावांपेक्षा वरसई थोडं मोठं असलं तरी ते लहानच वाटलं. सात-आठ किराणा मालाची दुकाने आणि चहा-भजीची चार-पाच हॉटेलं इतकीच काय ती बाजारपेठ मुख्य चौकात आहे. एका दुकानात चहा प्यायला बसलो तर बाळगंगा धरणासंदर्भातली नोटीस वाचायला मिळाली. वरसईसकट आजूबाजूची काही गावे आणि लोकांच्या जमिनी जाणार आहेत.


मघाशी रस्त्याला वाट दाखवत आलेल्या बाळगंगेच्या पोटात अख्खं वरसई जाणार असल्याचं हॉटेलवाल्याने सांगितलं. म्हटलं तुम्ही काही विरोध वगैरे काही केला नाही का?  तो म्हणाला सगळं झालंय करून आता धरणाचा फुगवटा इथे येणारच आहे. लोकांच्या जमिनींचे पेमेंट सुरु आहे, काही लोक आधीच बाहेर गेले आहेत, बाकीचेही जातील. पण मग तुम्हाला पर्यायी घरे आणि जागा कोठे मिळणार आहेत विचारल्यावर तो म्हणाला, अजून ते निश्चित नाही म्हणूनच सगळे थांबलोयत, मिळालं की जाणार. इतक्या महान पुरुषांचे जन्मस्थान असलेले हे गाव पाण्याखाली जाणार म्हणून वाईट वाटू लागलं. मग त्यालाच गावातले काही पत्ते विचारले आणि चहा पिऊन बाहेर पडलो.

 गोडसे भटजी गावात वरसईकर गोडसे किंवा बखरकार गोडसे भटजी म्हणून ओळखले जात असल्याचं जाणवलं. गावात शांतता जाणवण्यासारखी होती. बरीचशी घरं बंद होती, कदाचित त्या घरांचे मालक मुंबई-पुण्याला शहरात निघून गेले असावेत. काही घरांच्या भिंती पडून फक्त जोती शिल्लक होती. सर्वात आधी माझा प्रवासमध्ये वारंवार उल्लेख येणाऱ्या वैजनाथाच्या मंदिरात जावं म्हणून नदीच्या बाजूने गावाच्या दुसऱ्या टोकावर गेलो. गोडसे भटजींसकट सगळ्या वरसईकरांचे अपार श्रद्धास्थान असणारे वैजनाथाचे देऊळ आज एकदम भव्य वाटते. उत्तरेतून परतल्यावर विष्णूभटजी इथेच दर्शनाला आले होते. वरसईचे हे काका-पुतणे परतले हे कळल्यावर गागोदे, वावोशी, वरसईचे त्यांचे नातेवाईक आणि लोकही आले होते. बहुधा मंदिराच्या समोरच्या मोकळ्या पटांगणामध्येच त्यांच्या भेटी झाल्या असाव्यात.1915 साली गाभाऱ्यासमोर बांधलेल्या सभामंडपाला आता विष्णूभटजींचे नाव दिले आहे. 

वैजनाथानंतर आता गावात विष्णूभटजींचे घर पाहायचं होतं. ज्या घरामध्ये त्यांनी ग्वाल्हेरला बायजाबाई शिंदे करत असलेल्या सर्वतोमुख यज्ञाला जाण्यासाठी विचार केला, आई-वडिलांची परवानगी मिळवली, परतल्यावरही तेथे वास्तव्य केले ते घर आजही तसेच आहे. याच घरात विष्णू भटजींचा 1827 साली जन्म झाला. त्याच घराच्या जुन्या भिंती आणि जोत्यांची गोडसे भटजींचे वंशज दरवर्षी डागडुजी करतात. आज इथली गोडसे मंडळी नोकरी धंद्याच्या निमित्ताने सगळे शहरात, देशात परदेशात विखुरलेली आहेत. पण दरवर्षी महाशिवरात्री, दुसरा श्रावण सोमवार आणि त्रिपुरारी पौर्णिमेला जमतात. 



आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी आणि मुलगी यांची समजूत काढून 1857साली बाहेर पडले आणि 1860 साली परतले. परतल्यावर त्यांनी याच घराच्या अंगणात मावंदे घातले होते. सर्वांना गंगोदक देऊन खुश केले होते याच घराच्या परसामध्ये आई-वडिलांच्या हातून ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन मावंद्याचे जेवण सर्वांना दिले होते. आज त्यांच्या अंगणात गुरे बांधण्याची जागा पोलीस चौकीला देण्यात आली आहे, त्याच्या जवळच ग्रामपंचायतीची इमारतही दिसली. घराच्या थोड्या जवळच विष्णू भटजींचे नातू  पुरुषोत्तम नरहर गोडसे यांच्या नावाने शाळेला जमिन देण्यात आलेली आहे.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचे उपाध्ये असल्यामुळे वैद्यांच्या घरी ते कल्याणला नेहमी जात असत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चिंतामणरावांना बंडाच्या हकीकती सांगत असत. त्यामुळे एकदा वैद्यांनी त्यांना या आठवणी लिहून द्यायला सांगितल्या आणि त्याचे पुस्तक प्रकाशित करुन बदल्यात 100 रुपये देईन असे आश्वासनही दिले. त्यानुसार 1883 साली म्हणजे प्रवासावरुन परतल्यावर जवळजवळ 23 वर्षांनी विष्णूभटांनी लेखन केले. पण कायदेपंडित महादेवराव आपटे यांनी हे पुस्तक लेखक जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध करु नका असा सल्ला दिला. त्यामुळे विष्णूभटजींना त्यांच्या हयातीत हे पुस्तक पाहता आले नाही. 1901 साली विष्णूभटजींचा मृत्यू झाल्यानंतर सहा वर्षांनी मूळ मोडी हस्तलिखिताचे लिप्यांतर करुन, मजकूरात काही बदल करून वैद्यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. त्याला त्यांनी माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत असे नावही दिले. जवळजवळ चोवीस वर्षे माझा प्रवासचे हस्तलिखित जपल्यानंतर त्यांनी ते पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाकडे दिले. 1948 साली न. र. फाटक यांनी त्याची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यानंतर या हस्तलिखिताला महत्त्वाचा हात लागला तो म्हणजे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा, त्यांनी वैद्यांनी केलेल्या बदलांना काढून टाकून नवे पुस्तक 1966 साली मुळाबरहुकुम प्रसिद्ध केले. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. 

झाशीच्या राणीला दरबारात, रणांगणात, दैनंदिन कामकाज करताना, राजकारणातले निर्णय घेताना पाहणाऱ्या दुर्मिळ लोकांपैकी गोडसे भटजी होते. राणीचे त्यांनी केलेले वर्णन आणि तिचा ऑस्ट्रेलियन वकिल जॉन लॅंग याने केलेले वर्णन बहुतांश एकसारखे आहे. बंडाच्या धामधुमीचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणून माझा प्रवासची ख्याती वाढत गेली आणि ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये गेले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांसह 1857च्या बंडावर लिहिणाऱ्या इतिहास संशोधक, लेखकांनी माझा प्रवासचा विशेष उल्लेख आणि अभ्यास केलेला आहे.  अमृतलाल नागर आणि मधुकर उपाध्याय यांनी हिंदीमध्ये तर मृणालिनी शहा, मृणाल पांडे, प्रिया आडारकर, शांता गोखले यांनी या पुस्तकाचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला आहे. पण माझा प्रवासवर सखोल संशोधन करुन इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे तो ट्रॅवेल्स ऑफ 1857 या नावाने सुखमणी रॉय यांनी. विष्णूभटजींचे नातू पुरुषोत्तम गोडसे हे सुखमणी यांचे आजोबा. त्यामुळे लहानपणापासून त्यांचे वरसईला जाणे-येणे होते. घरामध्ये विष्णूभटजींच्या गोष्टीही सांगितल्या जात असत. सुखमणी रॉय यांनी माझा प्रवासचा सर्वांगाने अभ्यास विचार, संदर्भ गोळा करुन हा अनुवाद केला आहे. विष्णूभटांनी उल्लेख केलेले शास्त्रग्रंथही त्यांनी मिळवून अनुवादापुर्वी ते पडताळून पाहिले आहेत. मुंबईत पी.एन. दोशी कॉलेजमध्ये इंग्रजीविभागप्रमुखपदावरुन निवृत्त झालेल्या सुखमणी यांची वरसईला जाण्यापुर्वी मी भेट घेतली होती.


विष्णूभटजींचे  विष्णूभटजींचे पूर्वज आणि वंशजही तितकेच ज्ञानी आणि व्यासंगी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.  विष्णूभटजींचे वडिल बाळकृष्णशास्त्री हे पेशव्यांकडे सरदार विंचूरकर यांच्याकडे नोकरीस होते, 1817 साली ते पुन्हा वरसईत येऊन स्थायिक झाले. विष्णूभटजींना एकूण दहा अपत्ये होती. त्यातील नरहरशास्त्री हे सांगलीच्या पटवर्धनांच्या शिष्यवृत्तीने मोठे पंडित झाले. मुंबईमध्ये त्यांनी दोन गीता पाठशाळाही सुरु केल्या. त्यातील गिरगावातील माधवबाग येथे काढलेली पाठशाळा आपला भाचा वैजनाथशास्त्री याला चालवायला दिली. याच वैजनाथशास्त्रींचे पुत्र पांडुरंगशास्त्री आठवले यांनी पुढे स्वाध्याय परिवाराची स्थापना केली. दुसरी पिकेट रोडची पाठशाळा नरहरशास्त्री व त्यांचे पुत्र पुरुषोत्तम शास्त्री चालवू लागले. हे दोघेही वेदशास्त्रसंपन्न आणि विविध विषयांचा सखोल अभ्यास केलेले होते. त्यानंतर हा वारसा पुरुषोत्तमशास्त्री यांचे पुत्र दामोदरशास्त्री यांनी चालवला. दामोदरशास्त्री यांचे बंधू मधुसुदनशास्त्री हे अमेरिकेतील सहा महत्त्वाच्या पॉलिमर शास्त्रज्ञांमध्ये गणले जातात, आजही ते तेथे संस्कृत व योगसूत्रांच्या अध्यापनाचे काम करतात.


सुखमणी रॉय यांनी सांगितलेली गोडसे कुटुंबाची विद्वान परंपरा त्यांच्या घरासमोर आठवल्यावर त्यामध्ये थोडा वेळ गेला. मग गावातीलच माझा प्रवास नावाचे वाचनालय पाहून बाळगंगेवर गेलो. बाळगंगेच्या वेगवान प्रवाहाने तिच्या पात्रामध्ये विविध प्रकारची शिल्पे कोरली आहेत. मोठमोठी रांजणकुंडे, प्रवाहामुळे तासल्या गेलल्या दगडांवर नक्षी तयार झाली आहे. रांजणकुंडे पाहून आता वेळ होती परत निघण्याची. पेणच्या दिशेने जाणाऱ्या वडाप रिक्षामध्ये बसलो. सहप्रवाशांबरोबर बोलताना न राहवून पुन्हा धरणाचा विषय काढला. ते म्हणाले आता गाव उठणारच. वरसईबरोबर छोटा गागोदे जाणार. विनोबांच्या गागोद्यातल्या जमिनी जाणार पण गाव राहणार. विस्थापन कधीही होऊ शकतं. पुढच्या वर्षी. चार वर्षांनी, किंवा पाच,सहा वर्षांनी कधीही... गोडसे भटजी, इतिहासाचार्य राजवाडे, भारताचार्य वैद्य यांचे जन्मस्थान पुसले जाणार म्हणून मला येणारा इतिहासाचा कढ बाळगंगेच्या लोंढ्यात थोडाच टिकणार आहे ?
.....................
ओंकार करंबेळकर

(विशेष आभारः सुखमणी रॉय- मुंबई, वासुदेव गोडसे- डोंबिवली, ओंकार ओक-पुणे)
................................
संदर्भ आणि अधिक वाचनासाठीः
1) माझा प्रवास, 1857च्या बंडाची हकिकत- विष्णूभट गोडसे- प्रतिभा प्रकाशन
2)ट्रॅवेल्स ञफ 1857-अ ट्रान्सलेशन ऑफ विष्णूभटजी गोडसेज माझा प्रवास- सुखमणी रॉय- रोहन प्रकाशन
3)अॅडव्हेंचर्स ऑफ अ ब्राहमिन प्रिस्ट-विष्णूभट गोडसे- प्रिया आडारकर, शांता गोखले- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
4) झाशीची राणी लक्ष्मीबाई- प्रतिभा रानडे-राजहंस प्रकाशन
5) द रानी ऑफ झांसी- डी. व्ही. ताम्हणकर- रुपा पब्लिकेशन्स
6) इन द कोर्ट ऑफ द रानी ऑफ झांसी अॅंड अदर ट्रॅवल्स इन इंडिया- जॉन लॅंग- स्पीकिंग टायगर पब्लिकेशन्स

मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून



टर्किश आणि इराणी बाथच्या हमामबद्दल भरपूर ऐकले होते. नाटक-सिनेमा आणि प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतही त्याची भरपूर वर्णनं वाचलेली होती. मध्य-पूर्वेतले देश, ग्रीस, इराण, मोरोक्को इथल्या हमामांचे भरपूर फोटो इंटरनेटवर सापडतात. लख्ख चकचकीत संगमरवर, निळ्या-जांभळ्या काचांच्या खिडक्या, निळेशार पाणी वगैरे भरपूर वर्णन इंटरनेटवरही वाचायला मिळतं. घासून-पुसून अंघोळ झाल्यावर, अशा हमामच्या बाहेर गाद्यागिरद्या घातलेली जागा असते, तेथे तुम्हाला आराम करता येतो. आता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे. पण असं असतानाही मुंबईतला एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे. हे कळल्यावर या हमामखान्याला भेट द्यायची उत्सुकता आणखीच वाढली. मुंबईतल्या इमामवाडा या इराणी लोकांच्या वस्तीमध्येच हा हमामखाना आहे. या हमामखान्याबद्दल इंटरनेटवर एखाद-दुसरा लेख वाचायला मिळाला; पण फारशी माहिती नव्हती. स्वत: गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून इमामवाडा गाठला.


इमामवाडा व भेंडीबाजारचा परिसर महंमद अली रस्त्यालाच लागून आहेत. एरव्ही रमजान आणि संक्रांतीच्या काळात हा परिसर गर्दीने गजबजून जातो. पतंगांच्या दुकानांमुळे इमामवाड्याला वेगळी ओळख मिळाली आहे. साधारणत: १९०५च्या आसपास इराणमधील दुष्काळी परिस्थितीमुळे इराणी लोकांनी जगभरात स्थलांतर सुरू केले. त्यातील भारतात आलेल्या लोकांनी इमामवाड्यात इराणी (मुघल) मशिदीजवळ जागा घेऊन राहायला सुरुवात केली. मग त्यांची हळूहळू रेस्टॉरंट्स, बेकऱी, स्वीटमार्ट्स शहरात सुरू झाली. भेंडीबाजार पोलीस स्टेशनपासूनच हमामचा पत्ता विचारायला सुरुवात केली; पण कोणालाच काही सांगता येईना. एक-दोन हॉटेलात विचारले, तरी फारशी माहिती मिळेना, शेवटी एका बुजुर्ग माणसाने सांगितले, सरळ गेल्यावर मुघल मस्जिद विचारा, त्याच्या शेजारी ‘नीम का पेड’ आहे, तोच इराणी हमाम. थोडंसं अंतर चालत गेल्यावर मुघल मशीद लागली. मशिदीला लागूनच, निळ्या-जांभळ्या फरशांचे तुकडे जोडून मोझेक केलेली ‘इराणी हमाम’ अशी अरबी आणि इंग्रजी अक्षरातली पाटी दिसली; पण खुद्द इराण आणि तुर्कस्थानातल्या हमामांच्या रूपाशी ही अजिबात मिळती-जुळती नव्हती. जुनाटपणा आणि थोडीशी अस्वच्छता, यामुळे ती उगाचच जास्त ऐतिहासिक वगैरे वाटायला लागली.




लहानशा बोळातून आत गेल्यावर थेट हमामखान्याच्या हॉलमध्येच गेलो. इंटरनेटवरच्या इराणी हमामप्रमाणेच याची रचना होती; पण दोन्हींच्या रूपामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता. निळ्या, लाल, जांभळ्या, गुलाबी टाइल्सने चमचमणारे ते हमाम आणि इथला हमाम अगदीच वेगळा होता. अंघोळीची जागा असली, तरी इथल्या अनेक जागांना पाणी लागले नसावे, असे वाटले. काळवंडलेल्या, रंग उडालेल्या भिंती आणि सगळीकडे असणारा थोडासा ओशटपणा अंगावर येत होता. फोटोतले ते रंगीत प्रकाश पाडणारे दिवे, उन्हाची तिरीप पाडणारे झरोके, धुपदाण्या, कारंजे वगैरे इथे काही नव्हतं. चारही बाजूंनी मध्येच कापलेल्या अर्ध्या अंड्यासारख्या ओवऱ्या आणि मधोमध एक हौद होता. त्या हौदात एका  नळातून पाण्याची बारीक धार पडत होती, ओवऱ्यावरती चार-पाच पोरं अंग पुसत, भांग पाडत बसली होती. हमामच्या या बाहेरच्या हॉलला ‘सर्बिनेह’ म्हणतात.


कोणीतरी गिऱ्हाईक आलंय म्हटल्यावर, एका ओवरीतला पन्नाशीचा माणूस सावरून बसला आणि मसाज-अंघोळीचे दर सांगू लागला. देढसो, ढाईसो और पाचसो; पण थेट अंघोळ करण्यापेक्षा जरा माहिती मिळवावी म्हणून थोडे प्रश्न विचारू लागताच, त्याच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या. नाव काय, कोठून आलात, कधीपासून आहात, अशा प्रश्नांमध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. इतक्या सगळ्या प्रश्नांसाठी त्याने फक्त ‘महंमद अतिक मेरा नाम’ एवढंच उत्तर दिलं. अतिकसाहेब चांगलेच मितभाषी निघाले. मी कसनुसं हसून त्याला मोकळा करायचा अपयशी प्रयत्न केला; पण तो मितहाशीसुद्धा असावा, असे वाटले. शेवटी जास्तीत जास्त तुच्छता चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, ‘कितनेका मसाज करने का है.’ 

इथला पहिलाच अनुभव असल्यामुळे, मी दीडशेचा मसाज करायला तयारी दाखवली.

होकार मिळताच मात्र, अतिक एकदम प्रोफेशनल झाला. माझ्याशी बोलता-बोलता त्याने एक-दोन बाटल्यांमधील तेलं मिसळायला सुरू केली. मग एक अर्धगोलाकार ओवरी त्याने मला देऊ केली आणि कपडे बदलायला सांगितले. एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्यानं दिलेल्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो.


लहानसा पॅसेज ओलांडून त्याच्याबरोबर आतल्या तशाच एका हॉलमध्ये गेलो. गरम पाण्यामुळे तिथे थोडं उबदार वाटत होतं. याला ‘खाझिनेह’ म्हणतात आणि गरम पाण्याच्या जागेला ‘गर्मखाना’. गर्मखान्यात मोठ्या टाकीत कोमट पाणी साठवलेलं होतं. पोरं त्यात बादल्या बुचकळत आणि जरा बाजूला जाऊन अंघोळ करत होती. अशा चार-पाच लुकड्या पोरांची खाली मन लावून अांघोळ चाललेली. खसाखस अंग घासत आपल्याच नादामध्ये ती पोरं गुंग होती. आतल्या हॉलमध्ये गेल्यावर अतिकसाहेबाच्या वागण्यात थोडा हुकूम आणि जरबही जाणवायला लागली. मोठ्याने बोलणाºया पोरांना गेल्या-गेल्या त्यानं गप्प केलं आणि मला फरशीवर झोपायचा 'हुकूम' सोडला. तेव्हाच जाणवलं, आपला अधिकार आता चालणार नाही.  त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितले.

मीही त्याच्या आज्ञेबर निमूट तसे करत गेलो. मग त्याने तेलाच्या बाटलीतून डोक्यावर तेल थापायला सुरुवात केली. पाठोपाठ चेहरा असं करत, त्यानं तेल चोपडायला सुरुवात केली. सुरुवातीला हा कृश अंगकाठीचा वाटलेला माणूस चांगलीच ताकद बाळगून आहे हे जाणवायला लागलं. हळूहळू तेल लावणारी बोटं जोर लावायला लागली. कामाच्या ठिकाणी हा माणूस चांगलाच प्रोफेशनल निघाला. आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, ती एक निर्जीव वस्तू आहे, असा समज त्याने करून घेतला असावा, इतका जोर लावून त्याचा मसाज सुरू झाला. हाता-पायाला तेल लावून झाल्यावर मी कसाबसा एक प्रश्न विचारला, ‘ये कैसा तेल है.’ त्यावर ‘सरसों’ असं उत्तर मिळालं, पण त्यात ‘सरसों’बरोबर ‘प्रश्न बंद कर, गप्प बस’ असेही त्याने न उच्चारलेले शब्द ऐकायला आल्यासारखे वाटले, म्हणून गप्प बसलो.

आता त्याने पोटावर झोपायला सांगितलं. तेल लावून झाल्यावर अचानक एवढं जड काय वाटतेय, म्हणून मान वर करून पाहायचा प्रयत्न केला, तर साहेब चक्क माझ्या पाठीवर उभे राहिले होते. काही कळेपर्यंत पाठीपासून पायापर्यंत त्यांनी कालियामर्दन स्टाईल थयथय नाच सुरू केलेला. मला वर बघायची सोय नव्हती, पण या डान्सच्या वेळेस तो खूश असावा. कारण बहुतेक बऱ्याच महिन्यांनतर त्याला इतका आडवातिडवा विस्तार असलेलं गिऱ्हाईक मिळालं असावं, त्यामुळे मन लावून त्याने पायांनी कणीक तिंबायला घेतली होती. मला तोंडातून आवाज काढायलाही संधी न देता, यथेच्छ नाचून झाल्यावर तो उतरला. मग जरा ‘हुश्श’ म्हणेपर्यंत, त्याने माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हातांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

माझे धनुरासन, नौकासन आपल्या मनासारखे झाल्यावरच, त्याने हातापायांची सुटका केली. नंतर हातापायांचे आणखी हवे तसे व्यायामप्रकार करून घेतले. कधी माझा सुळावर चढवलेल्या आरोपीसारखा क्रॉस कर, मध्येच दोन्ही पोटरींवर पाय ठेव, तर कधी अचानक हाताने थाप मारून दचकवायचे, असे करत शेवटी त्याने बऱ्याच वेळानंतर तांडव थांबवले. वाटले आता संपले असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? पण त्याने तसेच झोपायला सांगितले आणि बाहेरून तो साबण आणि खरखरीत स्क्रबर घेऊन आला. एवढा जोर लावून तैलमर्दन झाल्यावर, त्याने एकाच हातात साबण आणि स्क्रबरने मला घासायला सुरुवात केली. हा स्क्रबर म्हणजे नारळाची शेंडी आहे की नायलॉनची जाळी हे अतिक अजिबात कळू देत नव्हता. ‘मी सगळी सेवा व्यवस्थित देतो; पण प्रश्न विचारू नका, भोचकपणा मुळीच चालणार नाही,’ असा सगळा मामला होता, म्हणून मीसुद्धा त्याला फार त्रास दिला नाही. जोरजोरात खराखरा घासून, त्याने सगळा तेलकटपणा काढून टाकला. त्याच्या या मर्दनानं खरं तर मस्त वाटायला लागलं होतं. पाठोपाठ अचानक त्यानं कोमट पाण्याच्या हौदातून बादलीभर पाणी आणून अंगावर ओतलं. आणि हौदाजवळ बुळबुळीत फरशीजवळ जाऊन उभे राहायला सांगितलं. सलग चार-पाच बादल्या भसाभस पाणी ओतून अांघोळ घातली. मग एक टॉवेल देऊ केला; पण मी माझा टॉवेल घरूनच नेला होता.

बाहेर येऊन अंग पुसल्यावर खरंच हलकं वाटायला लागलं, पाठही मोकळी झाली होती. दीडशे रुपयात इतकी कुस्ती झाली म्हटल्यावर, पाचशेमध्ये काय केलं असतं, असा विचार मनात आला. ‘देढसो और पाचसो में क्या फर्क है’ असे विचारताच अतिक म्हणाला, ‘तो हम बाहरसे मसाला लेके आते है और वो लगाते है.’ आता जरा तोही मोकळा झाल्यासारखा वाटत होता. पैसे देऊन झाल्यावर, तो थोडा-फार बोलायला लागला. मूळचा उत्तर प्रदेशातून आलेला. गेली काही वर्षे इकडेच राहात होता. थोडी-फार माहिती दिल्यावर, त्याने एका पाटीकडे बोट दाखवले. ‘सोरायसिस आणि हार्ट अटॅकच्या रुग्णांना मनाई’ अशी हिंदी, उर्दू आणि गुजरातीमध्ये लिहिलेली ती पाटी होती. आपण भरपूर मदत केली, असे वाटून तो खूश होऊन त्याच्या जागेवर जाऊन बसला. कपडे बदलून मीही निघालो, तोच बाहेर हमामच्या मालकीणबाई भेटल्या. हिदायती कुटुंब गेली अनेक दशके हा हमाम चालवते. त्यांच्या पुढच्या पिढीला या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता, बरेचसे लोक परदेशातच राहायला गेले होते. या मालकीणबाई आणि त्यांचे यजमान अजूनही हमाम चालवतात. ‘आया करो बेटा, आपके लियेही है हमाम,’ असे म्हणून त्यांनी निरोप दिला; पण खरंच पुढची किती वर्षे हा हमाम चालेल, हे समजणं खरंच अशक्य आहे. एके काळी कदाचित इथे मोठ्या संख्येने लोक येत असावेत.

या हमामसारखेच काही सलूनही लोकांना अांघोळीसाठी पाणी देत असल्याचे वाचले होते. इराणी हमाममधून बाहेर पडल्यावर तिकडेच जावे, असा विचार केला आणि पायीच निघालो. कामाठीपुरा छोट्या-मोठ्या उद्योगांनी खचाखच भरलेला आहे. भंगार व्यावसायिक, वेल्डिंग, दुकाने अशी वाट काढत ही दोन सलून शोधायची होती, पण इथेही इमामवाड्यासारखाच प्रकार होता. भरपूर समांतर गल्ल्यांमुळे भरपूर चौकही. त्यामुळे शोधाशोधीत बराच वेळ गेला.

पत्ता विचारल्यावर ‘कौनसी गली, वो बताओ’ हाच प्रतिप्रश्न लोक विचारत. शेवटी एकदाचे नवाब सलून सापडले. सलूनचे मालक बिलाल अहमद आणि त्यांचे कामगार गिऱ्हाईकांची वाटच पाहात होते. नोटाबंदीमुळे नवाबचेही व्यवहार थंडावलेले. बिलाल अहमद यांचे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी लखनौतून मुंबईला आले आणि त्यांनीच हे सलून सुरू केले.

कामाठीपुरा, महंमद अली रस्ता परिसरात कामगार भरपूर संख्येने येत, पण बाहेरगावातून येणाऱ्या या कामगारांसाठी अंघोळीची कोणतीच सोय नसे; पण नवाबसारख्या सलूननी त्यांची सोय केली. २५ पैशात हंडाभर पाणी त्यांना अंघोळीसाठी दिले जाई. २५ पैशांपासून वाढत गेलेला हा दर आता २० रुपयांवर गेला आहे. बोलताना बिलाल थोडेसे दुखावलेले वाटले. महागाई आणि नोटाबंदीमुळे थोडे कातावले होते. ‘मैं ये धंदा बंद करना चाहता हूँ, पुरानी पेहचान है इसिलिये शुरू रखा है. जिथपर्यंत होईल, तितके दिवस चालवणार नाहीतर बंद करणार, मी माझ्या भावालाही कुर्ल्याला वेगळं दुकान काढायला सांगितलं. कटिंग-दाढीचे काम कोठेही करता येईल,’ असे सांगत त्यांनी सलून दाखवले. आतल्या बाजूस तीन चिंचोळी बाथरूम होती, ‘पूर्वी लोकांना कपडेही धुवायला आम्ही द्यायचो, पण आता ते परवडत नाही.’


बहुतांश पारंपरिक व्यवसायांप्रमाणे यांची नवी पिढीही या व्यवसायात फारशी इच्छुक नाही. बिलालचा निरोप घेऊन डंकनरोडवरचे असेच पी. जी. सलून पाहून तो परिसर सोडला. एके काळी या परिसरात अशी पंधरा-वीस सलून होती, त्यातली ही दोनच उरलीत. मुंबईतला कोणताही कोपरा खरवडला की, इतिहास दिसायला लागतो. इराणी हमाम आणि हे सलून बदलाच्या चक्रात स्वत:ला टिकवून ठेवण्याचा अखेरचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही धडपड आणखी किती काळ टिकणार?.. मनात प्रश्न येतोच..

ओंकार करम्बेळकर


Monday, December 17, 2018

मुंबई आणि भारतातल्या भिश्ती समुदायाची माहिती तुम्हाला आहे का ?



नळबाजार, भेंडीबाजार, पायधुणी किंवा इमामवाड्यामध्ये गेलं की, हजार प्रकारचे व्यवसाय एकाच वेळी अंगावर यायला लागतात. लहान व्यापारी, फळं विकणारे, कुलूप-किल्ल्या विकणारे, पतंग, कपडे, भांडी, रद्दी, मोडलेल्या वस्तू, छत्र्या, घड्याळं अशा शेकडो वस्तू विकणारे शेकडो लोक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी आपापल्या जागा पकडून बसलेले दिसतात. कोणाची पथारी तर कोणाची एक माणूस बसेल इतकीच जागा आहे. प्रत्येकाने जणू फूटपाथच्या चौरस फुटावर हक्कच प्रस्थापित केले आहेत.

वस्तूंची इतकी संख्या आणि विक्रेत्यांमधली विविधता क्वचितच दुसऱ्या ठिकाणी दिसत असेल. या गर्दीच्या, घाई-गडबडीच्या परिसरामध्ये काही लुंगी लावलेले आणि पांढरे मळके किंवा खाकी शर्ट घातलेले अचानक माशासारखे सुळकन जाताना खूप वेळेस पाहिले होते. एका खांद्यावर पाण्याची सॅक घेतल्यामुळे तिरकेतिरके चालणारे हे लोके बघे-बघेपर्यंत गायब होतात. आता एवढे नळ आणि मुबलक पाणी असतानाही यांच्या पखालीतून कोण पाणी घेत असेल, असं वाटायचं, पण त्यांना नीट पाहायच्या आधी ते गायब व्हायचे. हे सटासट पळणारे लोक होते भिश्ती. पखालीतून पाणी भरणाऱ्या लोकांना भिश्ती (भिस्ती) किंवा मशकी, मशक म्हणतात. त्यांच्या पाठीवर असणाऱ्या कातडी पिशवीला मशक म्हणतात त्यामुळेच त्यांना 'मशक' नाव पडलं. तर भिश्ती शब्द फारसी 'बहिश्त'वरून (बहिश्त म्हणजे स्वर्ग) आला, असं म्हणतात. हे लोक स्वत:ला हजरत अब्बास आलमदार यांचे पाईक मानतात.

नागेंद्र सिंग आणि अब्दुल माबुद खान यांनी संपादित केलेल्या 'एन्सायक्लोपीडिया ऑफ द वर्ल्ड मुस्लीम्स: ट्राइब्ज, कास्टस्, कम्युनिटिज'च्या पहिल्या भागातील माहितीनुसार, हजरत अब्बास आलमदार हे दमास्कसच्या वाटेवर असणाऱ्या इमाम हुसैन यांच्या शिष्यांना, कातडी पिशवीतून पाणी आणून देणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी एक होते, त्यामुळे भिश्ती स्वत:ला त्यांचे पाईक मानत असावेत. त्यांच्या स्मृतीसाठी लखनौमध्ये हजरत अब्बास दर्ग्याची स्थापना करण्यात आली आहे.
हा दर्गा नवाब असफ उद्दौला यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला आहे, अवधच्या राजघराण्याने या दर्ग्याला विशेष महत्वाचे स्थान दिले होते. दर्ग्याच्या आवारात असणाऱ्या लहानशा बांधीव तळ्यामध्ये मशकची प्रतिकृतीही ठेवण्यात आलेली आहे. १८५७ साली उठावाच्या धामधुमीत हजरत अब्बास दर्गा महत्वाच्या घडामोडींचे केंद्र झाले होते. कंपनीविरोधात लढणारे शिपाई आणि बेगम हजरत महल यांच्या सैनिकांनी इथेच आश्रय घेतला होता. बंडाळी मोडून काढल्यावर ब्रिटीशांनी हा दर्गा लूटला आणि त्यातील काही वस्तूंचा लिलावही मांडला होता.



1857 च्या बंडाचे वर्णन माझा प्रवासमध्ये करणाऱ्या विष्णूभट गोडशांनीही भिश्ती लोकांनी बंडवाल्यांना मदत केल्याचे लिहिले आहे. भिश्ती लोकांनी महत्त्वाची पत्रे पोहोचवण्याचेही काम केले होते. कानपूरमध्ये घुसलेल्या इंग्रजांना पिटाळायला नानासाहेब, रावसाहेब पेशवे गेले तेव्हा लढाई इतकी हातघाईची झाली की कोणालाही क्षणभर उसंत मिळाली नाही. याबाबत गोडसे भटजींना वृत्तांत सांगणाऱ्या दोन ब्राह्मणांनी पेशव्यांच्या सैनिकांनी 'हातावरचे हातावर साखरपुऱ्या खाऊन भिस्ती याजकडून पाणी पिऊन' लढाई सुरु ठेवली होती असे सांगितल्याचे लिहिले आहे.

भिश्ती मुघलांबरोबर भारतात आले असावेत. पाकिस्तानसह, भारतामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद आणि कर्नाटकमध्ये अगदी अल्पसंख्येने हे लोक आज आढळतात. राजस्थानमध्ये अजमेर शरिफ, दिल्लीमध्ये जामा मशिदीजवळ ते एकवटलेले आहेत. जामा मशिदीच्या आजूबाजूच्या परिसरात मुंबईतील भिश्तींप्रमाणेच तिथल्या भिश्तींची लगबग सुरू असते.

 काही भिश्ती मशिदीजवळ मशक घेऊन उभे राहतात. त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये एकात एक ठेवलेल्या मोठ्या कटोऱ्यांची चळत असते. येणारे-जाणारे लोक आणि मशिदीमध्ये आलेले भाविक त्यांच्याकडून पाणी घेऊन तहान भागवतात. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहिलेले किंवा गेल्या तीस-चाळीस वर्षांमध्ये आलेले भिश्ती प्रामुख्याने राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून आलेले आहेत. मुंबईच्या इमामवाड्यातील एक भाग भिश्ती मोहल्ला म्हणूनच ओळखला जातो. आपल्याकडे त्यांची महाराष्ट्र भिश्ती समाज नावाची संस्थाही आहे म्हणे.

उत्तरेत रजपूत राजे आणि मुघलांनी यांना युद्धकाळात आपल्या सैनिकांना पाणी देण्यासाठी कामावर ठेवलेलं होतं. तहानलेल्या सैनिकांना पाणी देणं हे त्यांचं कामं. भिश्ती लोकांच्या लोककथाही भरपूर आहेत. निझाम नावाच्या त्यांच्या एका पूर्वजाने हुमायून बादशहाचे प्राण वाचवल्याची कथा ते सांगतात. शेरशाह सुरीच्या विरोधात लढताना हुमायून चांगलाच अडचणीत सापडला. त्याचे आप्तस्वकीयच शत्रूला जाऊन मिळाले. जखमी अवस्थेतच लढताना, हुमायून आणि त्याचा घोडा नदीमध्ये बुडू लागले. आपला बादशहा बुडतोय, हे पाहून निझाम नावाच्या भिश्तीने आपले मशक फुगवले आणि त्याच्या मदतीने हुमायूनपर्यंत तो पोहत गेला आणि राजाला वाचवलं, अशी ती कथा आहे. त्या बदल्यात हुमायूनने त्याला एका दिवसासाठी राजगादीवर बसवून सत्ता चालविण्याचे बक्षीस मंजूर केले.
काही ठिकाणी अडीच दिवस राज्य चालवायला दिले, या काळात त्याने अनेक निर्णय घेतले व चामडी नाणे आणि चामडी झेंडाही तयार केला, असे म्हणतात. थोडक्यात, मुघलांच्या सततच्या लढाईच्या काळात यांचं महत्त्व वाढलं होतं. ही परंपरा ब्रिटिशांनीही कायम ठेवली होती. रुडयार्ड किपलिंगची एका भिश्तीवर आधारित गुंगा डिन कविता जगप्रसिद्ध झाली होती.


मुंबईच्या इमामवाड्यात एकदा कामासाठी गेलो असता, पखालवाला माणूस दिसला आणि त्याला पकडायचं ठरवलंच. रहदारीच्या रस्त्यावरही भराभर चालणाऱ्या त्याच्यामागे अक्षरश: पळत जावं लागलं. महंमद अली रस्त्याच्या एका बाजूला या भिश्तीने त्याची पाण्याची गाडी लावलेली होती आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लहान विक्रेत्यांसाठी तो पखालीतून पाणी वाहून नेत होता.

किल्ली दिलेल्या खेळण्यासारख्या एका ठरावीक चालीत आणि वेगाने जाणाऱ्या त्याच्याशी बोलणं चांगलंच धावपळीचं होतं. त्याच्या कामाची वेळ असल्यामुळं थांबवताही येत नव्हतं. जैरीबुल त्यांचं नाव. गेली चाळीसेक वर्षे मुंबईत पखालीने पाणी भरण्याचं काम जैरीबुल करतात. मळकट लुंगी आणि खाकी शर्टबरोबर एक पाण्यानं भरलेली पखाल अशा त्याची महंमद अली रोडवर इकडून तिकडे खेपा चाललेल्या. दिवसभराच्या त्यांच्या काही ऑर्डर ठरलेल्या असतात. या रस्त्यावर फळं, रस विकणारे भरपूर लोक आहेत, त्यांना पाण्याची गरज असते आणि रस्त्यावर थेट नळ नसल्यामुळे त्यांना या पखालवाल्या भिश्तींचाच आधार होता. या फळवाल्या आणि रसवाल्यांची पिंपं भरण्याचं काम जैरीबुलकडे होतं.
 ते म्हणाले, आम्ही एरिया वाटून घेतलेत. दोघं-दोघं हे काम करतो. बावडीवरून पाणी भरून हे ढकलगाडीवरचे टँकर ठरावीक जागी लावून ठेवायचे. मग मशकमध्ये पाणी भरायचं आणि जागोजागी पिंपं भरून यायची. जैरीबुलच्या मते मशकमध्ये पाणी थंड राहतं, म्हणून त्यांच्याकडून लोक पाणी घेतात. जैरीबुल बिहारचे होते, मुंबईत जगणं महाग असल्यामुळं सगळं कुटुंब गावाकडेच ठेवलंय. पिढ्यानपिढ्या दुसरा कोणताच उद्योग घरी केला नसल्यामुळे, त्यांनी हेच काम स्वीकारलं.


जैरीबुलचा निरोप घेऊन आणखी भिश्ती कोठे सापडतील? असे विचारलं, तर ते लगेच म्हणाले, 'इस गलीसे कहाँ भी जाओ आपको वो लोग मिलेंगे'. जरा पुढं गेल्यावर नळबाजारात खरंच एक भिश्ती दिसले. एरव्हीसुद्धा हे लोक डोळ्यांसमोरच असतील, पण या गर्दीत ते कोठेतरी मिसळून जातात. भराभर चालण्यामुळे ते गर्दीत दिसेनासे होतात, पण आज अचानक ते दिसायला लागले होते.

एका कोपऱ्यावर दोन चाकाचे हाताने ढकलायचे टँकर लावून फूटपाथवरच्या एका बाजूने उघड्या झोपडीत सर्फुद्दीन बसले होते. रविवार असल्यामुळं निवांत होते. ते राजस्थानमधून मुंबईला आलेले आहेत. एक माणूस एका कुशीवर झोपू शकेल, एवढ्याशा त्या झोपडीत त्यांनी सगळ्या गरजेच्या वस्तू बसवलेल्या होत्या. पेव्हिंग ब्लॉक एकावर एक ठेवून दीड-दोन फूट उंचीवर हा आडोसा तयार केलेला. (तसेही हे ब्लॉक्स निरुपयोगीच असतात, किमान यांनी तरी त्याचा उपयोग केला हे पाहून बरं वाटलं). रेडिओ, फॅन, उर्दू कॅलेंडर, डोक्यावर येणाऱ्या कपडे वाळत घालायच्या दोऱ्या, चिमटे, बादल्या असं मोड्युलर किचनसारखं त्यांचा मोड्युलर संसार होता.

त्यांच्याशी गप्पा मारेपर्यंत आणखी दोन भिश्ती समोरून पाण्याचा टँक ढकलत आले. हे उमरदिन आणि सारिफ. हे सगळे पन्नाशी ओलांडलेले आणि क्वचित साठीचेही असावेत. वषार्नुवर्ष एकच काम करून थकलेले होते. ही जड बॅग खांद्याला दिवसभर लावल्यामुळे त्रास होत नाही का? असं विचारताच उमरदिन म्हणाले, 'तकलिफ तो बहोत होती है, लेकीन करना पडता है'.



हे दोघेही राजस्थानचेच होते. अजमेर शरिफजवळही हेच काम करत होते, पण सत्तरच्या दशकात तिकडच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, म्हणून स्थलांतर केलं. उमरदिन यांचे वालिदही मुंबईतच पाणी भरायचे काम करत होते. त्यांच्यापाठोपाठ हे इकडे कामासाठी आलेले.
या दोघांचीही मुलं शाळा-कॉलेजात जातात, पण इकडे पोट भरत नाही, म्हणून त्यांना गावाकडं ठेवलंय. 'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', असं सारिफ म्हणाले.

तुमचा हा पिढीजात धंदा तुमची मुलं पण करणार का? असं विचारताच, ते म्हणाले, 'नाही. मुलांनी शिक्षण घेतलंय, ती हा धंदा करणार नाहीत, त्यांच्या नशिबात असेल ते त्यांना मिळेल, पण ते या धंद्यात येणार नाहीत. आम्ही सगळे संपलो की भिश्ती व्यवसायही संपेल'. खरंच होतं, ते त्या दिवसात जितके भिश्ती दिसले, ते सगळे पन्नाशी उलटलेलेच होते. ह्यनयी पिढी नही आयेंगी, इसमे नयी भरती नहीं है, असं म्हणत उमरदिन आणि सरिफ दोघेही हसले. सर्फुद्दिनना आमच्या बोलण्यात आजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी सरळ झोपडीत जाऊन आमच्याकडे पाठ करून वामकुक्षी सुरू केली.

उमरदिन आणि सारिफनी पाण्याच्या गाडीवर टाकलेले दोन मशक दाखवले. मशक ही खरी त्यांची पिढीजात 'अ‍ॅसेट'. या एकमेव भांडवलावर ते धंदा करतात.  अख्ख्या बकरीच्या पूर्ण कातडीने बनवलेल्या या पिशवीत पाणी भरतात आणि एका खांद्यावर घेऊन ती वाहतात. त्या तिघांच्या मते हे कातडं कमावणं साधसुधं काम नाही. नेहमीचे चप्पलवाले हे काम करूच शकत नाही, असं उमरदिन म्हणाले. 'अगर कोई दुसरा ये मशक बनायेगा, तो उसमेसे पानी टपकेगा'. मग म्हटलं, 'या' मशक कोणी शिवून दिल्या आहेत. तर ते म्हणाले, त्यांचा शिवडीला कोणी एक  रेहमान नावाचा भिश्तीच 'कारिगर' आहे म्हणे, तो या बनवून देतो. तो फिरतफिरत येतो इकडे कधीकधी आणि नव्या मशक बनवून देतो, नाहीतर दुरुस्ती करून देतो. मशकची किंमतही दोन-तीन हजारांच्या पुढे सुरू होते. या एका मशकमध्ये तीस लीटर पाणी मावते आणि मशकच्या एका खेपेसाठी त्यांना तीस रुपये मिळतात. दिवसभरात अशा तीस-चाळीस खेपा कराव्या लागतात.

उन्हाळ्यात किंवा सणासुदीच्या काळात यांच्याकडच्या पाण्याला मागणी वाढते, पण आता नळ आले असताना तुमच्याकडून पाणी घ्यायची काय गरज पडते, असे या दोघांना म्हटलं, तर सारिफ म्हणाले, 'अहो ते नळ तुमच्यासाठी, इथं रस्त्यावर राहणाऱ्यांचं काय? उनका नहाना-धोना कहाँ करे? या लहानलहान विक्रेत्यांना लागणारं पाणी ते कुठून आणतील?' असं म्हणून त्यांनी शेजारच्या लोकांकडे बोट दाखवले. खरंच, आजूबाजूचे फूटपाथ लोकांनी खच्चून भरलेले होते. त्या सगळ्यांना घरं नव्हती. या अशा टीचभर झोपड्यांचे आडोसे त्यांनी सगळ्यांनी केलेच असतील, पण पाण्यासाठी भिश्तींशिवाय पर्याय नव्हता.

एके काळी या भिश्तींना पाण्यासाठी विहिरीवर (त्यांच्या भाषेत बावडीवर) जाऊन पाणी भरावं लागे. आता ते सी. पी. टँकच्या बावडीवर हे चाकाचे लहान टँक ढकलत घेऊन जातात, तिथून भरून आणलेले टँकर आपापल्या एरियात लावतात आणि एकेक मशक भरून पाणी वाटतात. या बोलण्यात बराच वेळ गेला होता. दोघांच्याही ऑर्डरची वेळ झाली होती. चाकाच्या टँकची तोटी उघडून त्यांनी आपापले मशक भरले आणि खांद्यावर अडकवले. मशकची मान पिरगाळून एका हातात धरली आणि मशकच्या हँडलवरती जोडलेल्या वादीने तोंड बंद केलं आणि बोलताबोलता ते गर्दीत नाहीसेही झाले.

गुंगा

गुंगा डिन (काही ठिकाणी उच्चार गंगाडिन असा केला जातो) नावाच्या काल्पनिक भिश्तीवर रुडयार्ड किपलिंगने १८९२ साली कविता लिहिली. हा गुंगा लढाईच्या काळामध्ये जिवाची पर्वा न करता सैनिकांना पाणी देत असे. एका युद्धाच्या प्रसंगी पाणी आणायला उशीर झाला, म्हणून ब्रिटिश अधिकारी त्याला मारतो आणि त्याचा अपमान करतो, मी तुज्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे याची जाणीव करून देतो. दुर्दैवाने या युद्धात गुंगाला गोळी लागते आणि त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर, त्या ब्रिटिश अधिकाऱ्यास आपण केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो आणि गुंगाच्या शवाजवळ बसून माणूस म्हणून माझ्पेक्षा तूच उच्च होतास, अशा शब्दांत तो भावना व्यक्त करतो, अशी ही कविता होती. या कवितेची प्रेरणा घेऊन १९३९ साली गुंगा डिन नावाचा हॉलीवूडपट तयार करण्यात आला. त्या काळात हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.


जातीचा ठसा नष्ट व्हावा- सरोवर झैदी, सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक

भिश्ती लोकांना मी सर्वात प्रथम डोंगरी आणि नळबाजार परिसरामध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्यावेळेस पाहिले. वर्षभर भिश्ती लोक आजूबाजूच्या भागामध्ये लोकांना, लहान व्यापाऱ्यांना पाणी पुरवतात, आजही उन्हाळ्यात किंवा पाण्याचा तुटवडा असेल अशा काळामध्ये उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेच्या कामासाठी लागणारे पाणी भिश्तींकडून घ्यावे लागते. मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील निजामुद्दीन दर्ग्याजवळही भाविकांना पाणी देणारे भिश्ती आढळतात. बदलत्या काळानुसार शहरात पाणी मिळवण्याचे नवे पर्याय निर्माण झाले आहेत. यामुळे भिश्ती लोकांना हा जुना व्यवसाय बदलून दुसरा व्यवसाय करता आला तर उत्तम होईल. त्यामुळे व्यवसायाबरोबर भारतीय जातीप्रथेतून आलेला जातीचा ठसाही नष्ट होईल.

सर्व फोटो: दत्ता खेडेकर